जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक रस्त्यांची चाळण झाली. विशेषत : ग्रामीण भागातील रस्त्याची तर अधिकच दुरवस्था झाली आहे. असे असतांना महामंडळातर्फे `सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी ` या ब्रीद वाक्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांना सुविधा देतांना बसच्या मेन्टेंन्सचा खर्चही वाढला असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे यंदाही एसटी महामंडळाची सेवा तीन महिने ठप्प होती. जून पासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरूवात केल्यानंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फेही टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. आता तर शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केल्यामुळे महामंडळातर्फे सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे शहरी व ग्रामीण मार्गावर बसेस धावत आहेत. मात्र, महामार्गालगतचे काही गावे वगळता इतर गावांच्या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. आधीच रस्त्यांची दुरवस्था झाली असतांना, त्यात यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यांची अधिकच चाळण झाली आहे. मात्र, तरीदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे ९० टक्के गावांना बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, ही सुविधा देतांना रस्त्यांची दुरवस्थेमुळे बसच्या मेटेंनन्सवर मोठा खर्च निघत असल्यामुळे, उत्पन्ना पेक्षा खर्चच महाग, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे महामंडळाच्या सुत्रांनी सांगितले.
ईन्फो :
सरू असलेल्या बसेस
जळगाव ते औरंगाबाद
जळगाव ते चोपडा
जळगाव ते भुसावळ
जळगाव ते रावेर
जळगाव ते भादली
इन्फो :
औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसचा मार्ग वळविला
अनलॉकनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात चाळीसगाव येथे झालेल्या पुराच्या परिस्थितीमुळे चाळीसगाव ते औरंगाबाद हा रस्ता पूर्णत :बंद आहे. त्यामुळे सध्या चाळीसगावहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस या न्यायडोंगरी मार्गे औरंगाबादला जात असल्याचे चाळीसगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
अनलॉक नंतर जिल्ह्यातील सर्व गावांच्या मार्गावर महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू आहेत. काही गावांना रस्त्यांची दुरवस्था असली तरी, प्रवाशांच्या सुविधेसाठी बसेस जात आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे काही प्रमाणात मेन्टेंन्सचा खर्च वाढतो.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी.