जळगाव : हवामानाच्या विपरित परिस्थितीत न डगमगता आंतरराष्ट्रीय सायकल रनचे आव्हान स्वीकारत जळगावातील पॅथॉलॉजिस्ट डॉ.अनघा चोपडे यांनी अवघ्या ९ तास २८ मिनिट १६ सेंकदामध्ये तब्बल २०० किलोमीटरचे अंतर पार केले.
स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसापूर्वी औरंगाबाद सायकलिस्ट क्लबतर्फे २०० किमी सायकल रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद ते गेवराई असा २०० किमी मार्ग १३ तास ३० मिनिटात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्ये स्पर्धेतील सहभागी सायकल रायडर्सला देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी १९ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यात जळगाव येथील पॅथॉलॉजिस्ट तथा सायकल रायडर्स डॉ.अनघा चोपडे यांच्यासह ४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. १४ रोजी या सायकलिंग स्पर्धेला सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. डॉ.अनघा चोपडे यांनी दिवसभर प्रखर ऊन आणि समोरुन वेगाने येणार्या हवेचा मारा सहन करत पहिले १०० किमीचे अंतर ४ तास ७ मिनिटात पूर्ण केले.