भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. १९९५मध्ये शिवसेनेने ही जागा भाजपाकडून खेचून आणली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. भुसावळची जागा शिवसेनेचीच आहे, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली असून मित्र पक्षाची नव्हे तर शिवसेनेचीच सावकारी राहील, असेही ठणकावून सांगितले आहे.
शहरातील बियाणी चेंबर्समध्ये शहर आणि तालुका शिवसेना पदाधिकार्यांची बैठक झाली.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा बैठकीत म्हणाले की, भुसावळच्या जागेचा प्रश्नच नाही. या मतदारसंघात भाजपाचा सतत पराभव होत गेला. त्यामुळे १९९५ मध्ये ही जागा शिवसेनेने खेचून आणली. आता ही शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेकडे श्रीमंत, मध्यम, गरीब व सर्व प्रवर्गातील उमेदवार आहेत. उमेदवारांची वानवा नाही. काही वेगळे घडत असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महायुतीचे जिल्ह्याचे नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे विनंती करू. मात्र जागा हातची गेलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
या वेळी किरण चोपडे, नरेंद्र पाटील, युवा सेनेचे अनिकेत चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कोण काय म्हणाले ?
विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास मुळे म्हणाले, वरणगावला मित्र पक्षाकडून फटाके फोडण्यात आले. वरणगावचा विकास थांबला आहे. कोणत्याही परिस्थितीत जागा जाता कामा नये.
जागा बदल झालेला नाही
जि.प.चे माजी सदस्य विश्वनाथ पाटील म्हणाले की, . भुसावळच्या जागेची अदलाबदल झालेली नाही. मित्र पक्षातील लोकांची नव्हे तर शिवसेनेचीच सावकारी राहील. शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल व भुसावळचा आमदार मंत्री होईल. जागा बदल झालेला नाही.
अन्याय सहन करणार नाही
उपजिल्हाप्रमुख सुखदेवराव निकम म्हणाले की, आमची जागा मित्रपक्ष गिळंकृत करीत असेल तर मतदार आम्हाला सहकार्य करणार नाहीत. वाटल्यास मला पक्षातून काढून टाका.
पण हा अन्याय सहन केला जाणार नाही.
आयत्या बिळावर कोणी येत असेल तर ते चालणार नाही. कोण्या प्रमुखांनी संघटनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. तुमच्या वाट्याला ही जागा जाऊ देणार नाही.
विजय आपलाच
माजी उपजिल्हाप्रमुख मनोज बियाणी म्हणाले, जागा शिवसेनेकडे आहे. विजय आपलाच आहे.
सत्ता घ्यावीच लागेल
माजी आमदार दिलीप भोळे म्हणाले, शिवसेनेने जिवाचे रान करून ही जागा राखली आहे. आता सर्व माजी आहेत. आजी होण्यासाठी सत्ता हाती घ्यावी लागेल. शिवसेनेचाच आमदार देऊ. जागेची अदला-बदल नाही. या वेळी प्रा.दिनेश राठी, प्रा.मनोहर संदानशिव, दिलीप सुरवाडे, रमाकांत महाजन, किरण कोलते, प्रकाश बत्रा, महेंद्रसिंग ठाकूर, बाळू भोई, माजी नगरसेवक अनिल भोळे, मुकेश गुंजाळ आदी उपस्थित होते. दीपक धांडे यांनी सूत्रसंचालन केले.
तर विरोध करू.
■ पालकमंत्री संजय सावकारे २५ रोजी अर्ज भरणार आहेत. त्यांनी साधी विचारपूस केली नाही. चर्चा केली नाही. त्यांना शिवसेना विरोध करेल. त्यांची ही कृती एकटे लढण्याची आहे, अशी टीका दायमा यांनी केली.