लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अवैधरीत्या देशी-विदेशी व गावठी मद्यविक्री करणाऱ्या १७४९ जणांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे दाखल केले असून, ७४७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ५७ लाख ७९ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी २४ मार्चपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरू झाले होते. हे लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात मद्याच्या विक्रीत घट झाली होती, त्याचा परिणाम महसुलावर झाला होता, तर अवैध मद्यविक्री करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली होती. या विरोधात १ एप्रिल २०२० ते २५ मार्च २०२१ या कालावधीत मोहीम राबवून देशी, गावठी व विदेशी मद्याची अवैध विक्री करणाऱ्या १७४९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये विक्रेत्यांकडून तब्बल ७० वाहने जप्त करण्यात आलेले आहेत.
याच काळात भरारी पथकाने जिल्हाभरात धाडसत्र राबवून ३९२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले तर १८० जणांना अटक केली. त्यांच्याकडून २६ वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनाचा समावेश आहे. दरम्यान, ७ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून आलेले मद्यही या विभागाने जप्त केले आहे. सीमा तपासणी नाक्यांवर पथके नियुक्त करण्यात आली होती.
कोट...
लाॅकडाऊन काळात मद्याची दुकाने बंद होते. त्यामुळे अवैध मार्गाने मद्याची विक्री करणाऱ्या लोकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली होती. गावठी व देशी मद्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. आताही लाॅकडाऊन असल्याने कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. अवैध मद्याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी कळवावी.
- चंद्रकांत पाटील, निरीक्षक, भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क
अशी आहे कारवाई
एकूण गुन्हे : १७४९
अटक आरोपी : ७४७
जप्त वाहने : ७०
मुद्देमाल किंमत : २,५७, ७९,०४४