जळगाव : दुचाकी चोरीत सराईत असलेल्या अमन उर्फ खेकडा सैय्यद रशीद (वय १९,रा.सुप्रीम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, खेकडाविरुध्द दुचाकी चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.
खेकडा दुचाकी चोरीत अट्टल गुन्हेगार आहे. तो व त्याचा सहकारी अशपाक उर्फ गुड्डया हारुन पटेल (रा.सुप्रीम कॉलनी) या दोघांनी काढून दिलेली दुचाकी चोरीची निघाली. ही दुचाकी फिरोज खान उर्फ बाबा चांद खान याच्याकडे मिळून आली. शहरातून रोज दुचाकी चोरी होत असताना दुचाकी चोरटे मात्र मिळून येत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस यांनी काही दुचाकी चोरांना पकडले, त्यांच्याकडून दुचाकीही हस्तगत झालेल्या आहेत. इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी मात्र अजूनही मिळून आलेल्या नाहीत.
चोरीची दुचाकी घेणाऱ्याला सोडले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या नासीर शेख सलीम शेख (रा.पहूर पेठ, जामनेर) याला अटक केली होती, त्याशिवाय चोरीची दुचाकी घेणाऱ्या एकालाही सहआरोपी म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र त्याला आरोपी न करता सोडून देण्यात आल्याने याविषयी उलटसूलट चर्चा होत आहे.