जळगाव : विरुध्द दिशेने येऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेविकेने वाहतूक पोलिसालाच खडे बोल सुनावल्याचा प्रकार बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता दूध फेडरेशनजवळील रेल्वे गेटजवळ घडला. नगरसेविकेच्या या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या म्हणीचा प्रत्ययच येथे आला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुल तोडण्याचे काम सुरु असल्याने गणेश कॉलनी, पिंप्राळा रेल्वे गेट व दूध फेडरेशन रेल्वे गेट या मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुक सुरळीत व कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांची ड्युटी लावण्यात आली आहे. बुधवारी दूध फेडरेशनच्या गेटजवळ वाहतूक शाखेचे भाऊराव घेटे यांची ड्युटी होती. वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने घेटे शिस्त लावण्याचे काम करीत होते. त्याचवेळी एक नगरसेविका दुचाकीने विरुध्द दिशेने आल्या. घेटे यांनी त्यांना थांबविले व तुमच्यामुळे सर्वच वाहनधारक विरुध्द दिशेने येतील व पुन्हा वाहतूक कोंडी होईल असे सांगितले असता नगरसेविका भडकल्या.तुम्ही मला ओळखत नाही का...पोलिसाने नियमाची जाणीव करुन देताच नगरसेविकेचा संताप झाला. तुम्ही मला ओळखत नाही का?..मला नियम सांगायचे नाही...तुम्ही तुमचे काम करा..अशा शब्दात लोकांच्या समोर खडे बोल सुनावले. चूक असतानाही वाहतूक पोलिसाला दोन शब्द सुनावले जात असल्याचा हा प्रकार अनेकांना खटकला. काही जणांनी त्याचा व्हिडीओ तयार केला आणि लगेच सोशल मीडियावर व्हायरलही केला. पोलिसाने महिला असल्याने नमते घेण्याची भूमिका घेतली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर दिवसभर फिरत होता. त्यामुळे या प्रकाराची चर्चाही बरीच झाली.
नगरसेविकेने सुनावले वाहतूक पोलिसाला चारचौघात खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:03 IST
नगरसेविकेकडून नियमांचे उल्लंघन
नगरसेविकेने सुनावले वाहतूक पोलिसाला चारचौघात खडे बोल
ठळक मुद्देजळगाव शहरातील दूध फेडरेशजवळील घटना