मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या मनपाचेच कर्मचारी विनामास्क
मनपा कर्मचाऱ्यावर कारवाईची एकही नोंद नाही : मनपा कर्मचाऱ्यांकडून नियमांचा भंग
एकूण करवाई
४३०
वसुली - १ लाख १५ हजार सुमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाच्या पथकाकडून शहरात मास्क न घालणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. एकीकडे शहरभर मनपाकडून कारवाई होत असताना, मनपाच्या इमारतीतच मनपा कर्मचाऱ्यांकडून नियमांचा भंग केला जात आहे. अनेक कर्मचारी मास्क लावत नसून, प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत आहे. शहरातील ५०० हून अधिक नागरिकांवर मास्क न घातल्यामुळे कारवाई केली जात असताना, दुसरीकडे मनपा कर्मचाऱ्यांनाच का ? अभय दिले जात आहे ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे स्वत: शहरातील रस्ते, बसस्थानक, बाजारपेठा, मार्केटमध्ये जावून जोररदार कारवाईचा धडाका लावत आहे. मात्र, दुसरीकडे मनपा कर्मचाऱ्यांकडूनच नियमांचा भंग केला जात आहे. गुरुवारी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत देखील अनेक मनपा कर्मचारी विनामास्क आढळून आले. मनपात येणारे अनेक नागरिक देखील नियमांचा भंग करत असून, अनेक पदाधिकारी देखील मनपाच्या आवारात विनामास्क फिरत असल्याचे सर्रास पहायला मिळतात. मात्र, या पदाधिकाऱ्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मनपाकडून आतापर्यंत नियम भंग करणाऱ्या एकाही मनपा कर्मचाऱ्याकडून दंडाची आकारणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच का ? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.
५० टक्के कर्मचारी विनामास्क
‘लोकमत’ च्या चमुने शुक्रवारी मनपाच्या विविध विभागांमध्ये जावून पाहणी केली असते, ५० टक्के कर्मचारी विनामस्क असल्याचे आढळून आले. तसेच अनेकांनी मास्क हनुवटीवर काहींनी केवळ तोंडावरच लावला असल्याचे आढळून आले. जि.प.मध्ये एकीकडे कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होत असताना, मनपामध्ये ती का ? होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट..
मनपा स्थायी समितीच्या सभेत ज्या सदस्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मास्क घातला नाही, त्यांच्यावर कारवाईचे अधिकार हे सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून सभापतींचे असतात. त्यांच्या अनुमतीनेच सभागृहाचे कामकाज हे सुरु असते. सभापतींच्या आदेशानुसार आम्ही कारवाई केली असते. दरम्यान, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरुच असून, ते मनपा कर्मचारी असो वा सर्वसामान्य असा भेद केला जात नाही.
-संतोष वाहुळे, उपायुक्त