लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना राबवित असून कोरोना या आजारातून नागरिकांना मुक्ती मिळावी व जीवित हानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय घेतला जात आहे. म्हणून आठवडी बाजारांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु, कोरोनाची धास्ती झुगारत बुधवारी भाजीपाला विक्रेत्यांनी पिंप्राळ्यात नव्हे तर निवृत्ती नगरात बाजार भरवला होता.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढला आहे. दररोज जिल्ह्यात नऊशेच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे़ त्याबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढल आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. बुधवारी पिंप्राळ्यात आठवडी बाजार भरतो. मात्र, बुधवारी पिंप्राळ्यातील बाजार रस्त्यावर सायंकाळी शुकशुकाट पहायला मिळाले. या ठिकाणी महानगरपालिकेचे पथक सुध्दा फिरताना दिसून आले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
एकीकडे पिंप्राळ्यात बाजार रस्त्यावर शुकशुकाट होते तर दुसरीकडे निवृती नगरातील केरळी मंदिर परिसरात कोरोनाची धास्ती झुगारत मोठा बाजार भरविण्यात आला होता. या ठिकाणी कुठलेही सुरक्षित अंतर पाळले जात नव्हते. काहींच्या चेहऱ्यावर मास्क सुध्दा नव्हते. त्यामुळे कोरोनाला आमंत्रण देताना नागरिक दिसून आले.
गल्ली-बोळात थाटली दुकाने
बुधवारी पिंप्राळा बाजार रस्त्यासह निवृत्ती नगर व पिंप्राळा रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. काहींनी गल्ली-बोळांमध्ये दुकाने लावून व्यवसाय थाटला होता. त्याठिकाणी सुध्दा कुठलेही सुरक्षित अंतर पाळले जात नव्हते. प्रशासनाकडून संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, बाजार भरवून दुसरीकडे कोरोनाला आमंत्रणही दिले जात आहे. बुधवारी जिल्ह्यात दिवसभरात ९९६ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी याचे गांभीर्य बाळगून काळजी घेणे आवश्यक आहे.