लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली शहरातील लसीकरण केंद्र शनिवारी सुरू झाल्यानंतर सर्वच केंद्रांवर गर्दी उसळली होती. यात शिवाजी नगर येथील डी.बी.जैन रुग्णालयातील केंद्रावर ऑफलाईन व ऑनलाईनमुळे मोठा गोंधळ उडाला होता. ऑफलाईनमध्ये शंभर जणांना लस न देताच रुग्णालयाने लसीकरण बंद केल्याचा आरोप नागरिकांनी करीत या ठिकाणी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. दुसरीकडे कांताई नेत्रालयातील केंद्रावर पहाटे चार वाजेपासून लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या.
शहरातील महापालिकेच्या ९ व रोटरी भवन न रेडक्रॉस या केंद्रांना दोन्ही लसींचे प्रत्येकी ४ हजार डोस शुक्रवारी सायंकाळी उपलब्ध झाले होते. यातील विविध वयोगट व लसींनुसार केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवस केंद्र बंद असल्याने शनिवारी केंद्रांवर गर्दी उसळली होती. यात शिवाजी नगरात नागरिकांनी लस न मिळाल्याने उपोषणाचा पवित्रा घेतला होता. सकाळी ७ वाजेपासून आलेले असताना केवळ ३४ क्रमांकापर्यंत लसीकरण सुरू असताना अचानक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ऑफलाईन लसीकरण थांबवून केवळ ओळखीच्याच लोकांना लस दिली जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. यावेळी २० ते २५ महिलांचीही उपस्थिती होती. या नागरिकांनी लस मिळत नसल्याने गेट समोरच ठिय्या मांडला होता.
पोलिसांना केले पाचारण
नागरिकांनी ठिय्या मांडल्यानंतर या केंद्रावर शहर पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, लसीकरणाचे किती डोस आले, किती दिले गेले याचे आम्हाला ऑडीट करून द्या, अशी मागणी नागरिकांनी केली होती. एका मुलीला परिचारिकेने केंद्राच्या बाहेर काढून देत मारल्याचा आरोपही नागरिकांनी केला. मात्र, असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नियमानुसारच लसीकरण : डॉ. भारंबे
ऑफलाईन पूर्ण १०० लोकांचे लसीकरण झाले होते. आम्ही दर अर्ध्या तासाने बाहेर येऊन नागरिकांना किती नंबर झाले आहे व किती लोकांना मिळू शकते, याची कल्पना देऊन उरलेल्यांना नंतर लस दिली जाईल, असे सांगत होतो. असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा भारंबे यांनी दिले आहे. दरम्यान, या ठिकाणी अन्य उपचारासाठीही रुग्ण येत असताना त्यांना आत घेतल्यानंतर आम्ही लसीकरणासाठीच कोणाला आत घेताये का असा संशय घेतला जात असल्याचेही त्या म्हणाल्या. आधी मोजकेच लोक बाहेर होते, मात्र, दोन वाजेनंतर गर्दी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
कांताई नेत्रालयात पहाटेपासून रांगा
जवळच्या केंद्रांना गर्दी होत असल्याच्या मानसिकतेतून आता नागरिकांनी दूरच्या केंद्रांकडे धाव घेत आहेत. कांताई नेत्रालयात शनिवारी अगदी पहाटे चार वाजेपासून लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अन्य केंद्रांवरही गर्दी झाली होती.