लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्या. डी.बी. साठे यांनी त्यांना पोलिसांविषयी काही तक्रार आहे का, पोलिसांनी मारहाण केली का, असे विचारले, त्यावर तीन जणांनी रात्री कोठडीत असताना कपडे काढायला लावल्याचे न्यायालयाला सांगितले. पोलिसांनी मारहाण केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा सातवा गुन्हा आहे. या आधीदेखील त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याशिवाय मोटार अपघातदेखील दाखल झालेला असून या गुन्ह्यातही त्यांची निर्दोष मुक्तता झालेले आहे. दंगलीचे तीन गुन्हे दाखल असून त्यापैकी एका गुन्ह्यात फिर्याद खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने हा गुन्हा निकाली काढण्यात आलेला आहे. इतर दोन गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. गेल्या महिन्यातच विनापरवानगी शिवजयंती करून शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १८८ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाणे वगळता सर्व सहा गुन्हे चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत.
गुटखा प्रकरणातही चव्हाण चर्चेत
मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या गुटखा प्रकरणात मंगेश चव्हाण चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी मेहुणबारे व स्थानिक गुन्हे शाखा या दोन्ही पोलिसांवर आरोप करून थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हाही त्यांनी पोलीस अधीक्षक व विशेष महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. गुटखा भरलेल्या वाहनांचा जळगावपर्यंत पाठलाग केला होता.
असे आहेत कलम व शिक्षा
३५३ : शासकीय कामात अडथळा- ५ वर्ष कैदेची शिक्षा
३३२: सरकारी नोकराला इच्छापूर्वक दुखापत
५ वर्ष शिक्षा
१४३ : बेकायदेशीर जमाव जमविणे
६ महिने शिक्षा
१४७ : दंगा करणे - २ वर्ष शिक्षा
१४९ : समान उद्दिष्ट साधून बेकायदेशीर जमाव जमविणे
५ वर्ष शिक्षा
३५१ : हमल्याचा उद्देश- ३ महिने शिक्षा
२९४ : अश्लील शिवीगाळ- ३ महिने २६९ : जीवितास धोका निर्माण करणे
६ महिने शिक्षा
१८८ : शासकीय आदेशाचे उल्लंघन
१ महिना शिक्षा
४२७ : नुकसान करणे - २ वर्ष
बीपी ॲक्ट १३५ : जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
४ महिने शिक्षा
फौजदारी सुधारणा कायदा १९३२ चे कलम ७ (अ) : कर्तव्यापासून परावृत्त करणे
६ महिने शिक्षा