अमळनेर : वयात आलेल्या तरूणीने स्वेच्छेने प्रेम विवाह केल्याचे लेखी दिल्यानंतरही ती अल्पवयीन आहे व तिच्यावर अत्याचार करून तिचे ख्रिश्चन धर्मांतर केले, अशी तक्रार तिच्या आजी-आजोबांनी केली आहे. याबाबत न्याय मिळावा म्हणून तालुक्यातील शिरूड येथील या आजी-आजोबांनी अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर सोमवारी उपोषण सुरू केले आहे.याबाबत शिरूड येथील सिंधुबाई हिरामण वैराळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरूड येथील शंकर शिवराम कढरे याने माझ्या अल्पवयीन नातीस पळवून नेऊन तिचा लैंगिक छळ केला. तिच्या संमतीवाचून हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात परावर्तित केले. याबाबत ५ रोजी पोलिसात तक्रार दिली असून आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याने या आजीने आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आजी आजोबांनी तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.पोलिसांनी प्रेमविरांना ताब्यात घेवून त्यांचे जाबजबाब घेतले असता दोघे एकाच समाजाचे असून दोघांनी संमतीने नाशिक येथे ९ आॅगस्ट २०१८ रोजीच नोंदणीकृत प्रेमविवाह केल्याचे स्पष्ट होत आहे. मिळालेल्या कागदपत्रांवरून मुलगी १२ आॅगस्ट १९९९ च्या जन्मतारखेनुसार सज्ञान असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी पोलिसांना स्वेच्छेने विवाह केल्याची कबुली देवून सोबत राहत असल्याचे लिहून दिले आहे. तरीही आजोबा- आजीने उपोषण सुरु केल्याने त्यांना १४९ प्रमाणे नोटीसही देण्यात आली आहे.दरम्यान निवेदनाची प्रत प्रांताधिकारी, डीवायएसपी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.
नातीचा प्रेम विवाह करीत बळजबरी धर्म बदल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 20:15 IST