अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शहर व ग्रामीण भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री पाटील यांचे शनिवारी सकाळी चाळीसगाव येथे आगमन झाले. पाहणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
३० व ३१ऑगस्ट रोजी अतिवृष्टी व त्यानंतर डोंगरी तितूर नद्यांना आलेल्या महापुरामुळे शहरासह ग्रामीण भागात शेतीसह दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. मोठ्या संख्येने पशुधनाची हानी झाली. पाण्याचा वेग भयंकर असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व माती वाहून गेल्याने शेती खरडून निघाल्यासारखी झाली आहे. तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम या गावांमध्ये पुराचा फटका सर्वाधिक बसला आहे. एकूण ४२ गावांमध्ये पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील महापुरांमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सर्वांना लवकरच शासनातर्फे मदत दिली जाईल. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर गावांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या गावांना संरक्षण भिंती बांधण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, पं.स. सभापती अजय पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.