लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता दक्षता म्हणून प्रशासनाने सर्व पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात आता उपकेंद्रावर नियुक्त समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना पुन्हा कोविड केअर सेंटरवर नियुक्ती देण्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि विमानतळ अशा ठिकाणी गर्दीनुसार या आरोग्य अधिकाऱ्यांची तपासणीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी चौदा दिवसांपर्यंत कोरोनाचा आलेख वाढता राहण्याची शक्यता असून वेळेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत बोलविण्याच्या प्रशासन तयारीत असल्याची माहिती आहे.
बसस्थानक, रेल्वेस्टेशन व विमानतळ ही दळणवळणाची व गर्दीची ठिकाणे असल्याने या ठिकाणीही हे आरोग्य अधिकारी थांबून प्रवाशांची तपासणी करणार आहे. गरजेनुसार त्यांची नियुक्ती करण्यात येईल, सद्य:स्थिती ग्रामीण भागात कोरेानाचा तेवढा संसर्ग नसल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही टप्प्या टप्प्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात डॉक्टर, परिचारिका आणि डाटा एंट्री ऑपरेटर्स अशा २५० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पुन्हा या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मार्चपर्यंतचा अंदाज
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही आणखी काही दिवस अशीच राहणार आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा आलेख वाढता राहू शकतो, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. मात्र, प्रशासनाच्या उपाययोजना सुरूच असून आगामी काळातही मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या बाबी पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही तज्ञ सांगत आहेत.