शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

चाळीसगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने अगोदरच तोळामासा असणारी खरिपातील पिके ऑगस्ट हीटमध्ये भाजून निघत आहे. मका, ...

चाळीसगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने अगोदरच तोळामासा असणारी खरिपातील पिके ऑगस्ट हीटमध्ये भाजून निघत आहे. मका, कपाशी ही पिके वाढीच्या स्थितीत असतानाच आभाळमाया आटली आहे. त्यामुळे संपूर्ण चाळीसगाव तालुकाच दुष्काळाच्या उंबठ्यावर उभा ठाकला आहे.

कोरोना महामारीत अस्मानी संकटाचे सावट गडद होऊ लागल्याने शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. सिंचनाखालील पिकांनादेखील आता पाऊस धारांची गरज आहे. मका, कपाशी पिकांना मोठा फटका बसणार असून, उत्पन्नात थेट पन्नास टक्के घट येण्याचा सूर ग्रामीण भागात उमटत आहे.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी देऊन कोरोनाच्या निराशाजनक वातावरणात बळीराजाला काहीशी उभारी दिली. शेतीचक्र काहीसे विस्कटले असले तरी, शेतकरी खरिपासाठी मोठ्या नेटाने कंबर कसली; मात्र मृग नक्षत्रापासूनच पावसाने ओढ घेण्यास सुरुवात केली. पावसाची गैरहजेरी पेरण्यांसाठीही मारक ठरली.

यावर्षी जुलै अखेरपर्यंत खरिपाच्या पेरण्या लांबल्या. एकूण ९० हजार हेक्टर क्षेत्र खरीप लागवडीखाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतची पावसाची ओढ शेतीक्षेत्रासाठी चिंताजनक ठरली आहे. पाऊस गायब झाल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे. कडधान्य पिकांची स्थिती ठीक असली तरी येत्या दोन ते तीन दिवसात त्यांनाही पावसाची नितांत आवश्यकता आहे. आभाळातून पाऊस परागंदा झाल्याने उन्हाचा पार वाढला आहे. वारा आणि ऊन यामुळे मका, कपाशी, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांनी माना टाकल्या आहेत.

चौकट

मका, कपाशीच्या उत्पन्नात ५० टक्के घट

पावसाचा मोठा ब्रेक मका, कपाशी पिकांना नख लावणारा ठरला आहे. सद्यस्थितीत बाजरीचे पीक फुटवे फुटण्याच्या स्थितीत आहे.

१...मका, तूर ही पिके वाढीच्या स्थितीत तर मूग, उडीद व सोयाबीन ही पिके शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

२...कपाशी पीक पाते व बोंडे लागण्याच्या स्थितीत पोहोचली आहे.

३...पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. यामुळे कपाशी, मका पिकांचे उत्पन्न निम्म्याने घटणार आहे. २०१८ नंतर म्हणजेच तीन वर्षांनंतर पुन्हा दुष्काळ दारात येऊन उभा असल्याचे चिंताजनक चित्र आहे. याचा मोठा फटका तालुक्याच्या अर्थकारणाला बसणार आहे.

चौकट

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमीच

गेल्या वर्षी तालुक्यावर आभाळाची कृपा जोमदार होती. तथापि, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. टाळेबंदीमुळे शेती उत्पन्न विक्रीचे गणितही बिघडले होते. अतिवृष्टीने पिकांची धूळधाण झाली असली तरी, रब्बी हंगामाला याचा काही अंशी फायदा झाला होता.

- यावर्षी १५ अखेर ३९१.६९ टक्के पर्जन्यमान झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ते २०९ मिमी अशा मोठ्या फरकाने कमी आहे.

- गतवर्षी १५ ऑगस्टपर्यंत ६००.७९ इतके पर्जन्यमान झाले होते.

- गिरणा धरणात रविवार अखेर ४० टक्के जलसाठा असून, पावसाळ्याच्या अडीच महिन्यात अवघे सात टक्के वाढ झाली आहे.

- मन्याडमध्येही जलसाठ्यात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत २५ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील १४ मध्यम जलप्रकल्पांमधील जलसाठा शून्यावर आहे.

- गिरणा धरणातून चाळीसगाव, मालेगाव, नांदगाव, दहीवाळ आदि नागरी पाणी पुरवठा योजनांसाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास जलटंचाईचे चटकेही बसू शकतील.

चौकट

चार नक्षत्रात अत्यल्प पाऊस

मृग, आद्रा, पुनर्वसू, आश्लेषा या चार पूर्ण पावसाच्या नक्षत्रांनी शेती - शिवाराची घोर निराशा केली आहे. चारही नक्षत्रांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. १६ पासून मघा नक्षत्राला सुरुवात झाली असली तरी आभाळात पावसाचा मागमूस नाही. २७ सप्टेंबर रोजी सुरू होणारे हस्त व १० ऑक्टोबरला प्रारंभ होणारे चित्रा ही तीन नक्षत्रे तेवढी आता उरली आहेत.

चौकट

अवकाळी नुकसानाचा छदामही नाही

२० ते २३ मार्च दरम्यान सलग चार दिवस तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळाने फळबागांसह केळी, मका, कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. एकूण ३६३० हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. ८३ गावांमधील १० हजार ९१८ शेतकऱ्यांना अवकाळी मार बसला; मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.