चाळीसगाव : दहा दिवसांपूर्वी दुष्काळाच्या फेऱ्यात येऊ पाहणाऱ्या तालुक्यातील शेती पिकांची स्थिती पुढच्या दहा दिवसांत अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे ओल्या दुष्काळाकडे झुकलेली असून, ओला दुष्काळ आता उंबरठ्यावर आला आहे.
अतिवृष्टीसह पुराचा मार झेलणारा बळीराजा ओल्या दुष्काळाच्या भरून आलेल्या सावटाने चिंतातुर झाला आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेती व्यवसायावर आर्थिक ताण आला आहे. शहरी बाजारपेठेलाही शेती अर्थकारणाला नख लागल्याने फटका बसला आहे. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने, तर ३१ रोजी आलेल्या पुराने तालुक्यात हजारो एकरवरील पिके उद्ध्वस्त करून टाकली आहेत. पुराच्या तीव्रतेमुळे शेती तर खरडून निघाली असून, काही ठिकाणी फक्त दगड उरले आहेत. पशुधनाचीही अपरिमित हानी झाली आहे. अनेकांची घरे, संसार पुरात स्वाहा झाली. शहरात दुकानांमध्ये १५ ते २० फुटांपर्यंत पुराचे पाणी शिरल्याने नुकसानीचा आकडा मोठा झाला आहे.
चौकट
ओल्या दुष्काळाचे सावट
३० ऑगस्टपासून सुरू झालेल्या पूर्वा नक्षत्राने जोरदार सलामी देत तालुक्यावरील दुष्काळाचे सावट दूर लोटले असले तरी अतिवृष्टी आणि पावसाची संततधार गेले आठ दिवस कायम असल्याने परिसरावर ओल्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे पिकांची वाटचाल दुष्काळाकडून ओल्या दुष्काळाकडे झाली आहे.
चौकट
ज्वारी-बाजरी होणार डिस्को
अगोदरच पावसाने ओढ घेतल्याने पिकांची वाढ तोळामासा झाली. त्यात कपाशीवर लाल्याचेही आक्रमण झाले आहे. पावसाची छत्री उघडीच असल्याने शेतांमधील पाण्याचा निचरा होणे थांबले आहे. ५० टक्के पावसाच्या ओढीने अगोदरच हिरावून घेतले. आता अतिवृष्टीने कपाशी पीक पिवळे पडण्याच्या स्थितीत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावला आहे. ज्वारी, बाजरी पिके धोक्यात आल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उद्भवणार आहे.
१...मूग, उडीद पिकांना फटका बसलाच आहे. अति पावसाने ज्वारी, बाजरीचे ‘डिस्को’मध्ये रूपांतर होणार आहे.
२...मका पिकासाठी हा पाऊस लाभदायक आहे.
३...विक्रमी पावसामुळे ६० हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला फटका बसू शकतो.
४...तालुक्यात ९० हजार हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. यातील बहुतांशी क्षेत्र कपाशीच्या लागवडीने व्यापले जाते.
चौकट
मंगळवारी पावसाचा जोर वाढल्याने अलर्ट
तालुक्यात सोमवारअखेर ८४० मिमी असा विक्रमी पाऊस झाला आहे. तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात ६६० मिमी पाऊस होतो. त्यामुळे सरासरी १२७ मिमी पाऊस झाला असून, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
सोमवारपासून पाऊस सुरू असल्याने मंगळवारची पहाटही पावसातच उगवली. पाटणादेवी परिसरात सातमाळा डोंगररांगांसह तितूर नदी क्षेत्रातही पाऊस झाल्याने दुपारी १२ वाजता तितूर व डोंगरी नदीची पाणी पातळी वाढली होती. प्रशासन अलर्ट झाले. बरोबर आठ दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी पहाटे डोंगरी व तितूर नदीला पूर आल्याने चाळीसगाव बुडाले होते. त्यामुळे मंगळवारी पुन्हा नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने ‘त्या काळरात्री’च्या कटू आठवणी ताज्या झाल्या.
शिवाजी घाट व जुन्या पुलावरील फेरीवाल्यांना तत्काळ हटविण्यात येऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
-तालुक्यातील १४ पैकी १२ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. देवळी-भोरस ३९ टक्के भरले आहे. बोरखेडा धरणात अजूनही ठणठणाटच आहे.
इन्फो
हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अलर्ट असल्याने पूर्ण प्रशासनाची टीम सतर्क केली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नदीकाठालगतच्या रहिवाशांनाही सूचना दिल्या आहेत.
-अमोल मोरे,
तहसीलदार, चाळीसगाव