भुसावळ : येणारे सण व उत्सव हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत साजरे करावे, असे आवाहन भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी ग्रा.पं. कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिकांना केले.
याप्रसंगी उपसरपंच आनंद ठाकरे, माजी सरपंच अनिल पाटील यांच्यासह विरोधी व सत्ताधारी पक्षाचे ग्रा.पं.सदस्य, तसेच भगत मंडळी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पो.हे.कॉ.वाल्मिक सोनवणे, पो.कॉ.विनोद पाटील उपस्थित होते.
कोरोनाचा अद्याप संपूर्ण नायनाट झालेला नाही, सण-उत्सव मुभा दिल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, खबरदारी म्हणून शासनाने कुठलाही सण-उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यासाठी निर्बंध लावले आहेत. नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस निरीक्षक शेंडे यांनी दिला, तसेच कोणाच्या भावना दुखावतील, गैरसमज पसरतील असे कार्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विलास शेंडे. सोबत अनिल पाटील, आनंद ठाकरे, कुंदन कोळी.
कुसुंबा येथेही झाली शांतता समितीची बैठक
उटखेडा : शासनाचे नियम पाळून गणेश स्थापना व विसर्जन करता येणार असल्याचे रावेर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी कुसुंबा येथे शांतता समितीच्या बैठकीत सांगितले.
यावेळी कुसुंबा बु.चे सरपंच सलिम तडवी, पोलीस पाटील असलम तडवी, कुसुंबा खुर्दचे पोलीस पाटील रईस तडवी, अतुल महाजन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.