भुसावळ : येत्या २१ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या त्याग व बलिदानाचे प्रतीक असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खडका रोड येथील हिरा हॉल येथे मुस्लिम समाजबांधव व पोलीस प्रशासनाच्यावतीने शांतता समितीची बैठक शेरोशायरीच्या वातावरणात झाली. नियमाच्या चौकटीत ईद गुण्यागोविंदाने साजरी करावी, यासह ईदला ईदगाहवरच जावे, असे नाही. या पार्श्वभूमीवर ‘‘पीने दे मुझे शराब, मस्जिद मे बैठ कर, या फिर वह जगा बता जहाँ खुदा नहीं’’, अर्थातच "खुदा" प्रत्येक ठिकाणी आहे. यासाठी ईदगाहात जाण्याची गरज नाही. शासनाच्या नियमानुसार घरीच शांततेत ईद साजरी करावी, असे शेरोशायरीत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी उपस्थित समाजबांधवांना सांगितले.
याप्रसंगी माैलवी, इमाम साहब, प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करताना, शासनास १०० टक्के सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन केले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पशुवैद्यकीय अधिकारी तायडे, संदीप परदेशी यावेळी उपस्थित होते.
पोलिसांची कारवाई
तत्पूर्वी शांतता कमिटीच्या बैठकीत खडका रोड भागातील काही परिसरामध्ये मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन करून काही गोवंश ताब्यात घेतले आहे. अर्थातच ही कारवाई पुढे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने करण्यात आलेली आहे. ज्यांची ही जनावरे असतील त्यांनी ती आपलीच असल्याची व आपण पशुपालनाच्या उद्देशाने घरासमोर आणण्याचे पुरावे आणल्यास त्यांनाही सहकार्य करण्यात येईल. मात्र कोणी जर नियमाचे उल्लंघन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाकचौरे यांनी दिला.