लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलिसांनी योग्य व उत्तमरित्या केलेल्या तपासामुळे घोटाळेबाजांना अटक झाली, त्याशिवाय ठेवीची रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे. यापुढेही बराच तपास बाकी असून, अशातच या गुन्ह्याच्या तपास अधिकारी सुचेता खोकले यांची बदली झाली, ती तातडीने थांबविण्यात यावी, यासाठी ठेवीदार व ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची भेट घेतली. त्याआधीदेखील आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
पोलिसांमुळेच ठेवीदारांना न्याय मिळायला सुरुवात झाली आहे. हार्ड डिस्क जप्त असल्याने अवसायकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाबही निदर्शनास आणून दिल्यानंतर नवटके यांनी हार्डडिस्क परत देण्यासह खोकले यांची बदली रद्द करण्याबाबत आपण पाठपुरावा करू, असेही त्यांनी आश्वस्त केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. ए. दाभाडे, रामचंद्र फिरके, रमेश मुंगसे, दिनकर भोगाडे, दीपा गुरनानी व कांचन खटावकर आदींच्या शिष्टमंडळाने नवटके व खोकले या दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले.