नंदुरबार : वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र आणि श्री संत भगवानबाबा यांचे समाधीस्थान असलेल्या भगवानगडसाठी नंदुरबारहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे. संत भगवानबाबा यांच्या 119व्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर वंजारी सेवा संघातर्फे बससेवा सुरू करण्याबाबत नंदुरबार आगाराला निवेदन देण्यात आले होते. भगवानबाबा यांचे भगवानगड हे समाधीस्थान असून वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्र आहे. येथे दरमहा वद्य एकादशीस मोठी यात्रा भरते. विजयादशमीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले जाते. खान्देशातही बाबांचे मोठे भक्त असून येथून थेट बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची नंदुरबार आगाराने दखल घेऊन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बस 13 ऑक्टोबरपासून रोज सकाळी साडेसात वाजता निघणार आहे. ही बस नंदुरबार, दोंडाईचा, धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, शिर्डी, राहता, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डीमार्गे भगवानगड अशी जाणार आहे. खान्देशातील पहिली बससेवा सुरू केल्याबद्दल विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी राजेंद्र जगताप, आगारप्रमुख संजय ढगे, पी.बी. भाबड यांचे वंजारी सेवा संघातर्फे प्रदेश सरचिटणीस पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी आभार व्यक्त केले.
नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा
By admin | Updated: October 11, 2015 23:56 IST