लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार जणांनी रविवारी पहाटे अडीच वाजता बळीरामपेठेतील राजा सेल्स हे फुटवेअर होलसेलचे दुकान फोडून २४ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. चेहरा झाकला असल्याने चोरट्यांची ओळख पटत नाही. दरम्यान, चोरट्यांनी अवघ्या १३ मिनिटात दुकानाचे कलूप तोडून रोकड घेऊन पोबारा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार शंकरलाल नाथाणी (रा. जयनगर) यांच्या मालकीचे हे दुकान आहे. रविवारी त्यांचे दुकान बंद होते. मध्यरात्री २.२० वाजता चेहरा पूर्णपणे झाकलेल्या अवस्थेत चार चोरटे त्यांच्या दुकानाबाहेर आले. या चोरट्यांनी शेजारी रेल्वेरुळावरुन रेल्वे जात असतानाच्या आवाजाचा फायदा घेत लोखंडी टॉमीने दुकाने तीन कुलूप तोडून आत प्रवेश केला. एक चोरटा लक्ष ठेवण्यासाठी बाहेर उभा राहिला तर तिघांनी आत जाऊन सामान अस्ताव्यस्त करीत छाननी केली. आतील एक गल्ला तोडून त्यात ठेवलेली २४ हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. पळून जात असताना त्यांनी पुन्हा अंधाराचा फायदा घेत रेल्वेरुळाकडे धाव घेतली. सोमवारी सकाळी नाथाणी हे दुकानात आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर मशीन तपासले असता चार चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले. यानंतर नाथाणी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.