दुरुस्तीची मागणी : दीड वर्षांपासून समस्या कायम
लोकमत न्यूज़ नेटवर्क
जळगाव : शिवाजी नगर परिसराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शिवाजीनगर हुडको व उस्मानिया पार्क कड़े जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीचे तुटलेले ढापे धोकादायक ठरत आहे. या ढाप्यात वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून अशी परिस्थिती असताना त्यात सुधारणा होत नसल्याने रहिवाश्यानी नाराजी व्यक्त केली आहे.
जुने शिवाजीनगरकडून शिवाजीनगर हुडको व उस्मानिया पार्ककडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे ढापे दिड वर्षापासुन तुटलेले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुध्दा ठेकेदार व नगरसेवक यांच्याकडून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. या रस्त्यावर नियमीत वाहतुक असते. पावसाळ्यात हे तुटलेले ढापे आणि रस्ता यामध्ये फरक कळत नाही. परिणामी, या तुटलेल्या ढाप्यांमध्ये सायकल, दुचाकी तसेच रिक्षा आदी वाहने अनेकदा अडकून अपघात होतात. मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ढाप्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
रस्त्यावर मोठे- मोठे खड्डे
गटारीच्या खड्डयातील लोखंडी सळई देखील बाहेर निघालेली आहे. रात्रीच्या वेळी ही सळई कुणालाही लागून दुखापत होऊ शकते. ढापे तर तुटलेले असून रस्त्यावर तीन मोठ- मोठे खड्डे झालेली आहेत. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जीव जाण्याआधी, उपाययोजना करावी...
अनेक वेळा तक्रारी करून देखील लक्ष दिले जात नाही. एखादे वाहन खड्ड्यात अडकून मोठा अपघात होउ शकतो. त्यामुळे कुणाचा जीव जाण्याआधी रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.