जळगाव : धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्याच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अटक केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्याचे काम सिंचन विभागाकडून तक्रारदार (तक्रारदाराच्या विनंतीवरून विभागाने नाव गुप्त ठेवले) यांच्या सोसायटीला मंजूर झाले होते. सन २०१२-१३ मध्ये या बंधार्याची कामे पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी दोन्ही बंधार्यांची सुमारे १८ लाखांची बिले तयार करून ती लघुसिंचन विभागाकडे जमा केली होती. ही बिले मंजूर होऊन त्यातील १२ लाखांची रक्कम त्यांना मिळाली आहे. मात्र या बिलातील २० टक्के रक्कम एक लाख ७५ हजार रुपये सिंचन विभागाकडे शिल्लक आहे. ही रक्कम घेण्यासाठी तक्रारदार हे लघुसिंचन विभागाच्या कार्यालयात गेले असता उपविभागीय अधिकारी सुरेश शिंपी यांनी त्यांच्याकडून संपूर्ण बिलावर अडीच लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी हे काम आपल्याला परवडले नसल्याचे सांगितल्याने त्यांनी तडजोड करीत दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येत उपअधीक्षक डी.डी. गवारे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक फौजदार मोजोद्दीन शेख, ज्ञानदेव घुले, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब जाधव, राजन कदम, हेमंत शिरसाठ, संजय अहिरे, विजय दुसाने, अनिल चौधरी यांनी लघुसिंचन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. शिंपी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये ११ हजार रुपयांची लाच घेताना दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अटक केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास उपअधीक्षक डी.डी.गवारे करीत आहेत. शिंपींची महिनाअखेर सेवानिवृत्ती अटक करण्यात आलेले उपविभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी हे मे महिन्याच्या अखेर सेवानिवृत्त होत आहेत. मंगळवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने घरी पाहुण्यांची आणि नातेवाईकांची गर्दी आहे. सेवानिवृत्ती पूर्वी येणारा लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा करण्याचा त्यांचा विचार होता. त्यातच ही कारवाई झाल्याने कुटुंबीय व मित्रांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे धाव घेतली. ११ हजारांचा आकडा शुभ तक्रारदार हे मंगळवारी दुपारी शिंपी यांच्या कार्यालयात लाच देण्यासाठी आले. पैसे दिल्यानंतर शिंपी हे पैसे मोजून घेतील असे गृहीत धरत ११ हजार ५०० रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी शिंपी यांना आपल्याकडून जास्त रक्कम दिली असे सांगत उर्वरित रक्कम परत करण्याची विनंती केली. शिंपी यांनी रक्कम मोजून घेतली. दहा हजाराऐवजी ११ हजार ५०० रुपयांची रक्कम निघाल्याने त्यांनी तक्रारदार यांना केवळ ५०० रुपये परत केले. ११ हजार रुपयांचा आकडा आपल्यासाठी शुभ असल्याचे सांगत त्याने रक्कम खिशात ठेवली. त्यानंतर पथकाने शिंपी यांच्यावर झडप घालत रंगेहाथ अटक केली.
लघुसिंचनचा लाचखोर अधिकारी अटकेत
By admin | Updated: May 14, 2014 00:44 IST