अमळनेर : प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेरातून जाणारी बोरी नदी यावर्षीदेखील मुबलक पाण्याने जलमय झाल्याने अमळनेर येथील महिला भगिनींनी एकादशीच्या दिवशी नदीतीरी जाऊन साडी-चोळी अर्पण करीत आरती करून ओटी भरली.
आमच्या बोरी माईला बाराही महिने असेच जलमय राहो आणि बळिराजासह प्रजेचे कल्याण होवो, अशी सामूहिक आराधना महिला भगिनींनी पर्जन्यदेवतेसह विठू माउलीकडे केली.
यावेळी उज्ज्वला शिरोडे, अनिता जामखेडकर, अर्चना वर्मा, सरला चौधरी, कल्पना शिरोडे, रूपाली संगिले यांच्यासह असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या. महिला भगिनींच्या या उपक्रमात बच्चे कंपनीदेखील सहभागी होऊन सामूहिक आरती करण्यात आली. दरम्यान, पूर्वीच्या काळी बोरी नदी वर्षभर वाहत असे. विशेष म्हणजे अमळनेर शहराची पाणीपुरवठा योजनादेखील बोरी नदीवरूनच होती. याशिवाय बोरी काठावरील अनेक गावेदेखील याच नदीवर अवलंबून होती. मात्र, काळाच्या ओघात नदीचा सततचा प्रवाह थांबून काही वर्षांपासून उन्हाळ्यातदेखील नदीला पाणी येत नव्हते. परंतु, दोन वर्षांपासून पावसाळ्यात का असेना, बोरी नदी प्रवाहित होत असल्याने बळिराजासह जनता समाधानी आहे. या जीवनदायी ठरणाऱ्या बोरी माईची अमळनेरच्या भगिनींनी साडी-चोळीने ओटी भरून प्रार्थना केली आहे.