पंढरीनाथ गवळी / ऑनलाइन लोकमतभुसावळ , जळगाव, दि. 18 - राज्य तीव्र उन्हामुळे होरपळत आहे. अनेक ठिकाणी घोटभर पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत आहे. अशी सर्वत्र भीषणस्थिती असताना भुसावळ शहरात मात्र न आटणारा ‘जल खजिना’ वर्षानुवर्षे अजिबात कमी न होता तो वाढतच आहे.भुसावळ नगरपालिका कार्यालयाच्या आवारात व नगरपालिका मालकीची सुमारे 100 वर्षापूर्वीची विहीर आहे. ती नगरपालिका अस्तित्वात येण्याआधीची असावी, असा जाणकार सांगतात. पालिका कार्यालय आवारातील विहिरीची रचना गोलाकार आहे. बांधकाम चुना व दगडांमध्ये करण्यात आले आहे. विहिरीची खोली सुमारे 40 फुटापेक्षा जास्त आहे. विहिरीतील जलसाठा कायम 20 फुटापेक्षा जास्त आढळून येतो. 1974 च्या व त्या आधीच्या दुष्काळी स्थितीत ही विहीर भुसावळकरांसाठी वरदान व जीवनदायी ठरली होती, असे जाणकार आजही सांगतात. पालिका आवारातील विहिरीचा विषय निघताच जुनी मंडळी सांगतात की, या विहिरीला फार पाणी आहे, विहीर जुनी आहे, ती कधीच आटली नाही, ब्रिटिश काळात ती बांधण्यात आली असावी, असे सांगितले जाते. या विहिरीचे पाणी अतिशय गोड व शुद्ध असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जाते. आजही शहरात ज्या दिवशी पाण्याची समस्या निर्माण होते, त्या दिवशी शहरवासीयांसाठी याच विहिरीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, असे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सूत्रांनी सांगितले. आजही या विहिरीवरून रोज 20-25 टॅंकरद्वारे हजारो लीटर पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे ही विहीर भुसावळकरांसाठी कोणत्याही कठीण व आणीबाणीच्यावेळी पाण्यासाठी तारणहार ठरणारी आहे.नगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार 1989-1990 मध्ये संपूर्ण शहरात पिण्याची पाण्याची समस्या उद्भवली होती. त्यावेळी सतत तीन दिवस 12 हजार लिटर क्षमतेचे टँकर लावून चार वीज मोटारी लावून या विहिरीतून पाणी घेण्यात आले. मात्र विहिरीतील पाणी साठा कमी झाला नाही. या विहिरीतून आजही रोज सुमारे 10 ते 15 टँकर पाणी ओढले जाते.
सतत वाहणारा ‘जल खजिना’ भुसावळसाठी ठरतोय वरदान
By admin | Updated: May 18, 2017 14:01 IST