जळगाव : पांडे चौकात लुंकड टॉवरमध्ये रंगकाम करताना बाबुलाल बनीमियॉं पटेल (वय ४०, रा. तांबापुरा) यांचा बुधवारी दुपारी चार वाजता मृत्यू झाला. इमारत मालकाने चार लाखाची मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात न नेता थेट घरी नेण्यात आला. मदत देऊ शकत नसल्याचे मालकाने रात्री कळविल्यानंतर नातेवाईकांनी दफनविधी न करता दुसऱ्या दिवशी मृतदेह थेट जिल्हा रुग्णालयात आणल्याचा प्रकार गुरुवारी घडला. दिवसभराच्या चर्चा व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चकरा मारल्यानंतर सायंकाळी पटेल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन दफनविधी करण्यात आला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुलाल पटेल हे पेंटरचे काम करायचे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता सहकारी सिकंदर तडवी यांच्यासोबत पांडे चौकातील लुंकड टॉवरमध्ये सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करीत असताना पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरताना त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पटेल यांचे कुटुंब व नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. लुंकड यांच्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. ते अनेक वर्षापासून त्यांच्याकडे कामाला होते. काही लोकांच्या मध्यस्थीने पटेल यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देण्याचे लुंकड यांनी मान्य केले, अंत्यविधी झाल्यानंतर ही रक्कम मिळणार होती. त्यामुळे मृतदेह जिल्हा रुग्णालयात न नेता थेट तांबापुरात नेण्यात आला. याबाबत पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली नाही, अशातच रात्री साडे नऊ वाजता लुंकड यांनी फोन करून आपण मदत करू शकत नसल्याचे कळविल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. रात्री पाऊस असल्याने दफनविधी शक्य झाला नाही.
जिल्हा रुग्णालयात गोंधळ
मदत न मिळाल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी सकाळीच ८ वाजता पटेल यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. पटेल यांची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशनतर्फे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकील शेख अहमद, दगडू शहा पेंटर यांनी केली. जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेहाचा ताबा न घेण्याचा पवित्रा घेतला. काही जणांनी लुंकड यांची भेटही घेतली. त्यानंतर नातेवाईक सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. तेथे एमआयडीसी पोलीसही पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, त्यानंतर मदतीचे आश्वासन मिळाल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पटेल यांच्या पश्चात आई अबीदाबी, पत्नी फरिदा, फरान, सना, शहिन हे तीन मुले आणि लतीफ, हारुन आदील, शरीफ हे तीन भाऊ असा परिवार आहे.
इन्फो...
मुलीच्या वाढदिवसालाच पित्याचा मृत्यू
पटेल यांच्या मुलीचा बुधवारी वाढदिवस होता. पहिल्यांदाच तिचा वाढदिवस करण्याचे नियोजन पटेल यांनी केले होते. कामावरून घरी येताना केक आणण्याचेही त्यांनी मुलीला सांगितले, मात्र केक ऐवजी पित्याचाच मृतदेह घरी आल्याने एक मोठे संकट या कुटुंबावर कोसळले.