पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
जळगाव : स्वराज्य निर्माण सेना, शिवतांडव प्रतिष्ठान, शिवगंध पारंपरिक वाद्य पथक, हिंदू राष्ट्र सेना व नेहरू चौक मित्रमंडळातर्फे चाळीसगाव येथील पूरग्रस्तांना धान्य, चटाई, चादरी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वस्तू शनिवारी सायंकाळी एका वाहनातून संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी रवाना केल्या.
शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत पालकमंत्र्यांना पत्र
जळगाव : सध्या सुरू असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ठिकाणी आराखड्याप्रमाणे उड्डाणपुलाच्या आजूबाजूला ३ फुटांचा पादचारी पूल उभारणे, पुलावर जाण्या-येण्याकरिता दोन्ही बाजूस लोखंडी जिन्यासह तसेच ‘टी’ आकाराचा पूल होण्याकरिता पिलर उभारावेत, अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जळगाव : शासनाने गेल्या महिन्यापासून सर्वत्र अनलॉक केल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विशेषत : परप्रांतीय बांधवांची या गाड्यांना मोठ्या संख्येने गर्दी आहे. मात्र, डब्यांमध्ये प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्यामुळे, कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता प्रवाशांमधून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.