जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या १२पैकी ९ संशयित आरोपींना पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या संशयितांना दिनांक २२पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्त्वात पंधरा पथकांनी ही कारवाई केली. या कारवाईत गुरुवारी सुवर्ण तथा हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे प्रेम नारायण कोगटा, जयश्री मणियार, संजय तोतला (सर्व रा. जळगाव), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेंद्र लोढा (सर्व रा. जामनेर), भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली यांचा मुलगा आसिफ तेली, प्रीतेश जैन (रा. धुळे), अंबादास मानकापे (रा. औरंगाबाद), जयश्री तोतला (जळगाव) व प्रमोद कापसे (रा. अकोला) या १२ जणांना अटक करण्यात आली होती. यातील प्रेम कोगटा, जयश्री तोतला व अंबादास मानकापे यांना गुरुवारी पुण्याच्या न्यायालयात हजर केले गेले होते. त्यांना सुनावणीअंती २२पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, शुक्रवारी उर्वरित नऊ जणांना पुणे येथे न्या़. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनादेखील २२पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले.