अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये टाइप १ डायबिटीजचे प्रमाण वाढले असून, हा चिंतेचा मुद्दा झाला आहे. या असाध्य अशा ऑटोइम्युन विकारामध्ये रोगप्रतिकार यंत्रणा स्वत:च स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करते. यातील वेदनादायक भाग म्हणजे या मुलांना जगण्यासाठी कायम इन्सुलिन इंजेक्शन्सवर अवलंबून राहावे लागत आहे. भविष्यात ही समस्या अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाळ वारंवार डायपर ओले करत असेल तर पालकांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
टाइप १ डायबिटीज होण्याचे कारण
टाइप १ डायबिटीज हा आजार प्रामुख्याने शरिरातील रोगप्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे, स्वादुपिंडातील इन्सुलिन स्राव निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यानंतर कळते. यासह आई-वडिलांना हा आजार असल्याने अनुवांशिकतेमुळेदेखील हा आजार होण्याचे एक कारण आहे.
काय आहेत लक्षणे
१. बाळाला वारंवार लघवी येणे
२. स्थुलपणा वाढणे, उलट्या होतात, मंदपणा जाणवतो.
३. मुलांमध्ये चिडचिडपणा वाढणे, या लक्षणांकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे असून, वेळेवर उपचार सुरू करणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
डॉक्टर म्हणतात...
टाइप १ डायबिटीजचे प्रमाण ज्या मुलांच्या पालकांना डायबिटीज आहे. अशा मुलांना जास्त करून आढळून येत आहे, तसेच लहानपणीच हा आजार आढळल्यास तो कायम स्वरुपी राहत असतो.
-डॉ.संजय बाविस्कर.
अनुवंशिकतेमुळे लहान मुलांमध्येही टाइप १ डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे. बाळाला वारंवार लघवी येणे, स्थुलपणा वाढले या लक्षणांकडे लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
-डॉ.राधेश्याम चौधरी