पहूर, ता.जामनेर : शनिवारी पहूर पोलीसांना सापडलेल्या बेवारस बाळाची ओळख सोशल माध्यमातून पटली आणि बाळाच्या आईने रविवारी सकाळी पहूर पोलीस स्टेशन गाठून आपल्या लाडक्या प्रीन्सला कुशीत घेतले. मायलेकांमध्ये झालल्या चार दिवसांच्या ताटतुटीनंतर त्यांचे मिलन पहूर पोलीसांनी घडवून आणले. यावेळी आईचे हृदय दाटून आले होते.पाचोरा रेल्वे स्थानकावर १० रोजी गुरवारी पहूर येथील मारोती आंबोरे या युवकाकडे रेल्वे पोलिसांनी बेवारस बाळ सोपाविले होते. यानंतर पहूर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून कर्तव्यातत्परतेचे दर्शन घडविले. या बाळाची आई सोनू करण शिंदे तुर्भे, जि.ठाणे येथील असून त्याचे नाव प्रिन्स असल्याचा खुलासा आईने केला. नवी मुंबईतील तुर्भे येथे रेल्वे स्टेशनवर सोनू या पाणी पिण्यासाठी गेल्या असता प्रिन्सला कोणीतरी बेपत्ता केले होते. मात्र सोशल मीडियावर ई-पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोरडीवाल यांच्याशी पहूर पोलीसांनी संपर्क केला. फोटोवरून बाळाच्या आईने हा आपला मुलगा प्रिन्स असल्याची ओळख दिली.
प्रिन्सला शनिवारी पोलिसांनी खेळविले.या बाळाला खेळविण्यात पोलीसांचा तणाव विसरला गेल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. काही वेळासाठी का होईना, बाळाने पोलिसांना आपलेसे केले होते. रविवारी सकाळी साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, भरत लिंगायत, रेखा जाधव, अनिल देवरे यांनी बाळाला आईच्या ताब्यात दिले. तसेच तिला भाड्यासाठी सर्व पोलिसांनी आर्थिक मदत जमा करून दिली व सन्मानाने परत पाठविले.