जळगाव : भुसावळ येथील विठ्ठल-रुखमाई अर्बन को-ऑप. सोसायटी या पतसंस्थेतून घर बांधकामासाठी कर्ज घेऊन त्याची परतफेड केली नाही, म्हणून कर्जदार गोपाल नारायण राणे यांच्या पाठोपाठ जामीनदार त्यांचा मुलगा समीर गोपाळ राणे (रा. निगडी, पुणे) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
भुसावळ येथील विठ्ठल-रुखमाई अर्बन को-ऑप. सोसायटी या पतसंस्थेतून ८४ जणांनी वेगवेगळ्या कारणाने खोटे दस्तऐवज सादर करून कर्ज घेतलेले आहेत. त्यांना १०० जण जामीनदार झाले असून, लेखापरीक्षकांनीही यात संस्थेची फसवणूक केली आहे. त्यामुळे सनदी लेखापरीक्षक राजेश कळंत्री (रा. दत्त कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून ८४ कर्जदार, १०० जामीनदार व एक लेखापरीक्षक अशा १८५ जणांविरुद्ध १८ जून २०१६ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा आता तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे. अपहार व फसवणुकीचा आकडा हा ११ कोटी ६४ लाख ५८३ रुपये इतका आहे. या गुन्ह्यात अनेक आरोपींना अटक झालेली असून, काहीजण जामिनावर आहेत. पुणे येथील गोपाळ राणे यांनी घराचा वरचा मजला बांधकामासाठी तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, तर त्याला मुलगा समीर हा जामीनदार होता. पोलीस निरीक्षक बळिराम हिरे, हवालदार प्रवीण जगताप, दीपक पाटील, शफी पठाण यांच्या पथकाने राणे याला पुण्यातून अटक केली.