पाणीटंचाई आराखडा तयार, फक्त ९ गावांना लागेल टँकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एप्रिल ते जून या तिमाहीत १५०७ महसुली गावांपैकी ३९४ गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते तर ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. यात अमळनेर तालुक्यात सात, बोदवड आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये झालेला समाधानकारक पाऊस, जीवनदायिनी गिरणा नदीवरील बंधारे, वाघूर, गिरणा, हतनूर यासारखी धरणे पूर्ण भरल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागलेला नाही. जिल्ह्यात एकूण १५०७ महसुली गावे आहेत. त्यापैकी ३९४ गावांना यंदा पाणी टंचाईच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जिल्ह्यात ९७ विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण केले जाणार आहे. तर २६६ विंंधन विहिरीचे अधिग्रहण केले जाऊ शकते.
पाणी टंचाईचा आराखडा तयार
पाणी टंचाई अहवाल ऑक्टोबर ते जून या कालावधीत तीन तिमाहीसाठी तयार केला जातो. त्यापैकी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या काळा जिल्ह्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाईची समस्या नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडे त्याची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. पाणी टंचाईचा कृती आराखडा जळगाव जिल्हा परिषदेने तयार केला आहे.
कुठेही टँकर नाही.
मार्च सुरू झालेला आहे. राज्यातील बहुतेक गावांमध्ये पाणी टंचाईचे स्वरुप बिकट झाले आहे. मात्र सुदैवाने जळगाव जिल्ह्यातील एकाही गावाला पाणी टंचाईचा सामना अजून पुढचा महिनाभर तरी करावा लागणार नाही. जिल्ह्यातील एकाही गावातून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आलेली नाही.
९७ विहिरींच्या अधिग्रहणाचा आराखड्यात समावेश
जिल्ह्यातील ९७ विहिरी आणि कूपनलिका यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये गरज भासेल त्या गावांमध्ये या विहिरीचे अधिग्रहण केले जाऊ शकते.
जिल्ह्यातील एकूण गावे १५०७
बोअरवेलची होणार दुरुस्ती २६६
विहिरीतील काढला जाणार गाळ १७
पाणी टंचाईची शक्यता असलेली गावे ३९४
पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती - २०