लोकमत न्यूज
जळगाव : नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगावात शरीररचना शास्त्र विभागाच्या प्रमुखपदी बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला मात्र, ते जळगावात येऊनही या ठिकाणी पदच रिक्त नसल्याने त्यांच्या रूजू
होण्याचा तिढा अधिकच वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत नेमका पदभार कोणाकडे याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शरीररचना शास्त्र विभागाचे पद रिक्त नसले तरी अधिष्ठाता म्हणून आपण रूजू झाल्याचे डॉ. फुलपाटील यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला कळविले आहे.
डॉ. फुलपाटील हे जळगावात पदभार घेण्यासाठी आल्यानंतर त्यांची ज्या मूळ पदावर बदली झाली आहे. ते मूळ पदच रिक्त नसल्याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयात मेलद्वारे पत्र पाठिवल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत
आहे. गेल्या दोन दिवसांपासून या विषयावर चर्चा व वरिष्ठ पातळीवर बोलणे सुरू होते. डॉ. रामानंद आणि डॉ. फुलपाटील यांचीही बराच वेळ या विषयावर बैठक झाल्याचे समजते. डॉ. फुलपाटील यांची २६ ऑगस्टनंतर बदली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ते नागपूर येथून कार्यमुक्त
झाले होते. ७ रोजी जळगावात ते आले. मात्र, अद्याप वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अधिकृत कुठलेच लेखी आदेश प्राप्त नाहीत.
असा आहे संभ्रम
- डॉ. फुलपाटील यांची बदली झालेले मूळ पद जळगावात रिक्त नाही
- अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे मूळ पद असलेले धुळे येथील औषधशास्त्र विभागाचे पद रिक्त नाही
- डॉ. रामानंद यांनी जर फुलपाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला तर त्यांनी कुठे रूजू व्हायचे याचे आदेशात स्पष्टीकरण नाही.
- जळगावातील शरीरचना शास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी मग जायचे कुठे हाही एक प्रश्न आहे.
रूजू झाल्याचे कळविले.
डॉ. फुलपाटील यांनी शरीरचनाशास्त्र विभागाचे पद रिक्त नसल्याने आपण अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त पदावर रूजू होत असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना कळविले आहे.