वरणगाव, ता. भुसावळ : फुलगावजवळील अपघातांची मालिका गेल्या तीन दिवसांपासून सुरूच आहे. १५ जून रोजी पुन्हा अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात पिता ठार, तर मुलगा जखमी झाला.
नेर, शहापूर, जि. बऱ्हाणपूर (म. प्र.) येथील रहिवासी असलेले नामदेव हरी प्रजापती ( कुंभार ) व त्यांचा मुलगा रामकृष्ण नामदेव प्रजापती (कुंभार) हे वरणगाव येथे मोटारसायकल (एमपी १२-एमएच-३९३६) ने आले होते. काम झाल्यावर ते फुलगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. घरी परत जाण्यासाठी निघाल्यानंतर उड्डाण पुलाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलीस जबर धडक दिल्याने मुलगा व वडील खाली फेकले गेले व जबर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी नामदेव प्रजापती यांना मृत घोषित केले. रामकृष्ण प्रजापती हे किरकोळ जखमी झाले आहेत.