लोकमत न्यूज नेटवर्क
वाघडू, ता. चाळीसगाव : स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगलची चोरी केल्याप्रकरणी वाघडू येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अँगलची किंमत १७,५०० रुपये आहे.
वाघडू येथील स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तारेच्या कुंपणाचे काम सन २००९- १०मध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात आले होते. रविवारी (दि. १९) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीतील लोखंडी अँगल तोडून भंगार विक्रेत्याला विक्री केल्याची बाब उघडकीस आली.
ग्रामसेवक सुनील पवार व ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील यांना गावात भंगार विक्रेत्याच्या वाहनात हे लोखंडी अँगल आढळून आले. याबाबत भंगार विक्रेत्याकडे चौकशी केली असता असता त्याने स्मशानभूमी जवळील वस्तीतून आपण विकत घेतल्याचे सांगत काही नावेही सांगितली. या प्रकरणी ग्रामसेवक सुनील जगन्नाथ पवार यांनी फिर्याद दिली. त्यावरून छगन मानसिंग गायकवाड, सोमनाथ छगन गायकवाड, अर्जुन छगन गायकवाड, जगन जगन गायकवाड व भंगार विक्रेता अशा पाच जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.