एरंडोल : तालुक्यातील विखरण व कासोदा येथील अंगणवाडी दहा सेविकांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात निकृष्ट मोबाइल परत दिले. हे मोबाइल प्रकल्प कार्यालयाने दिले होते. यावेळी प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील व वरिष्ठ लिपिक नाकवे उपस्थित होते.
तालुक्यात अजून काही गावांतील सेविका निष्कृष्ट मोबाइल जमा करणार आहेत. सध्याच्या मोबाइलची वारंटी-गॅरंटी संपलेली असूनही ते खपवले जातात तर काहींचा कॅमेरा खराब झालेला आहे} काहींचा डिस्प्ले खराब झालेला आहे तर काहींना रेंजच राहत नाही. तरीसुद्धा सेविका या घरचे मोबाइल वापरून काम करीत आहेत. हे सर्व मोबाइल जमा करून नवीन जास्त जीबीचे दर्जेदार मोबाइल पुरवावे, अशी मागणी जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने करण्यात आली आहे.
मोबाइल जमा करतेवेळी तालुकाध्यक्ष सुनंदा पाटील, ज्योती साळी, अंजना महाजन, रजूबाई माळी, छाया पाटील, तारामती खैरनार, संध्या सोनार, उर्मिला चौधरी आदी सेविका उपस्थित होत्या, असे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.