लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : म्युकरमायकोसिससारख्या जीवघेण्या आजारासोबत सतत अडीच महिने संघर्ष करत तालुक्यातील पहिल्या रुग्णाने या गंभीर आजारासोबतची लढाई जिंकण्यात यश मिळविले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काकोडा येथील माजी उपसरपंच शांताराम चोपडे हे बाधित झाले होते. उपचार घेऊन ते कोरोनामुक्त होऊन घरीसुद्धा परतले होते. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मुक्ताईनगर येथील डॉ. एन. जी. मराठे यांचेकडे तपासणी केली. डॉ. मराठे यांना त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणं आढळून आल्याने चोपडे यांच्या इतर तपासण्या केल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसचे निदान झाले आणि पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात भरती करण्यात आले.
अडीच महिन्यांचा संघर्ष
२ मे रोजी शांताराम चोपडे यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या नाकपुडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा त्यांच्यासोबत केवळ तीन रुग्ण उपचार घेत होते. त्यानंतर म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढू लागली आणि दररोज कोणीतरी रुग्ण दगावू लागला. अशावेळी चोपडे यांनी सकारात्मक विचारांच्या बळावर अडीच महिने लढा देत म्युकरमायकोसिसला पराजित केले. १२ जुलै रोजी शांताराम चोपडे हे सुखरूप आपल्या कुटुंबात पोहोचले. यावेळी गावातील नातेवाईक, ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.