जळगाव : खोदकाम सुरू असताना पाषाणातील मूर्ती, नाणी तसेच मंदिरे सापडल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, गुरुवारी जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात अजबच प्रकार घडला. अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदकाम सुरू असताना चक्क कुदळ, घमेली तसेच पावडी खोदकाम करताना आढळून आली आहे.
अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या पाइपलाइन टाकण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये खोदकाम सुरू आहे. गुरुवारी सकाळी स्वातंत्र्य चौकातील एका गल्लीत जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या मधोमध पाइप टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते. खोदकाम सुरू असताना अचानक १२ फुटांवर कामगारांना चक्क सुमारे २५ कुदळ, आठ ते दहा पावडी तसेच काही घमेली आढळून आली. कित्येक वर्षांपासून ते तिथे पडून असल्यामुळे त्यांना जंग लागला होता. दरम्यान, कुदळ, पावड्या सापडून आल्यानंतर परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी त्या ठिकाणी झाली होती.
दरम्यान, तीस ते चाळीस वर्षांपूर्वी शहरातील कॉलनी परिसरात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असावे. त्यावेळी या कुदळ व घमेली तसेच पावड्या या खड्ड्यात कुणीतरी टाकून दिल्या असाव्यात, असा संशय अनेकांनी व्यक्त केला. काही वेळेस माठ, हाड तर कधी पुरातन अवशेष आढळून येतात. मात्र, कुदळ, पावड्या आढळून आल्यामुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.