जळगाव : मनपाकडून मालमत्ता करात एकूण करयोग्य मूल्यावर 0.५ टक्के वृक्षकरही आकारला जातो. गेल्या दहा वर्षात सुमारे ३ कोटींच्या आसपास वृक्षकराची वसुली झालेली असताना त्या तुलनेत वृक्ष लागवड व संवर्धनावर मनपाकडून खर्च झालेला दिसत नाही. लावलेली झाडेही जगविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.
मनपा व त्यापूर्वी न.पा.कडून मालमत्ताकरात करयोग्य मूल्याच्या 0.५ टक्के रक्कम वृक्षकर म्हणून वसूल केली जाते. वर्षभरात सुमारे ३0 लाखांच्या आसपास ही रक्कम वसूल होते. गेल्या १0 वर्षात सुमारे ३ कोटींच्या आसपास रक्कम वृक्षकरापोटी वसूल करण्यात आली आहे. ज्या कारणासाठी ही रक्कम वसूल केली, त्याच कामावर ती खर्च होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही.
मनपाकडून वृक्ष लागवडीवर व वृक्षसंवर्धनावर अपेक्षित खर्च व परिश्रम घेतले जात नसल्याचे चित्र आहे. इतकेच काय, मनपाची उद्यानेदेखील उघडी, बोडकी दिसू लागली आहेत.
जळगाव शहराचे तापमान उष्ण असल्याने वातावरण थंड राहण्यासाठी शहर व परिसरात अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. मात्र नेमके याच विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कागदोपत्री १0 वर्षात ८५ हजार वृक्षलागवड
तत्कालीन न.पा.च्या काळात दरवर्षी सुमारे हजार रोपांची लागवड मनपातर्फे केली जात असे. मनपा निर्मितीनंतर दरवर्षी सुमारे २५ हजार रोपांची लागवड केली जात असे. तर मागील वर्षी केवळ सामाजिक वनीकरणकडून फुकट मिळालेली ५ हजार रोपे लावण्यात आली. गेल्या १0 वर्षात या हिशेबाने कागदोपत्री सुमारे ८५ हजार वृक्षलागवड मनपाने केली आहे. मात्र शहरातील चित्र पाहता, ही आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास येते. कारण रोपांची लागवड न करता अनेक संस्थाना रोपांचे वाटप करून टाकले जात असे. त्याची लागवड केली की नाही? ती रोपे जगविली का? याची माहिती मनपाकडे नाही. तसेच मनपा प्रभाग कार्यालयांतर्फे लागवड केलेल्या रोपांबाबतही किती जगली? याची आकडेवारी मनपा दप्तरी नाही.