याआधी दि. २९ मे रोजी कोविशिल्ड लसीचे २०० डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर दररोज लस उपलब्ध नसल्याचे संदेश दिले जात असल्याने लसीकरण राहिलेले नागरिकांत नाराजीचा सूर आहे. सद्य:स्थितीत केवळ ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सामान्य नागरिकांना लसी दिल्या जात असून याशिवाय ४५पेक्षा कमी वय असलेल्या केवळ फ्रंटलाईन गटातील नागरिकांना लस दिली जात आहे. ४५वरील अनेक नागरिकांचे लसीकरण शिल्लक असल्याने दररोज ते लसीकरण केंद्रावर फेऱ्या मारत आहे. लसीकरणास वेग येण्यासाठी यात सातत्य असावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
कोव्हॅक्सिन लसीचाही तुटवडा
कोविशिल्ड लसीच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीची उपलब्धता अतिशय कमी असून ज्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल, त्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस मिळेल की नाही, अशी भीती वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत लोक आता कोविशिल्ड लसीचाच आग्रह करताना दिसून येत आहे. मात्र किमान ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसरा डोस वेळेवर मिळेल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.