‘त्या’ पुढाऱ्याच्या मुलाचे लग्न ठरले होते. मुलगा तसा हडकुळा (खानदेशी भाषेत पपडी
पैलवान) मात्र त्याला लग्नात भलेमोठे मनगटी घड्याळ हवे होते. घड्याळ
खरेदीसाठी पिता-पुत्र एका ओळखीच्या घड्याळाच्या दुकानात गेले. मुलाने मोठ्या
घड्याळाची मागणी केली. दुकानदाराने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या
घड्याळांपैकी सर्वांत मोठे घड्याळ दाखवले. मुलाला त्यापेक्षाही मोठे घड्याळ
हवे होते. त्यावर दुकानदाराने सांगितले की, जास्त मोठे घड्याळ त्याच्या हाताला
शोभणार नाही. मात्र मुलाच्या हट्टापुढे दुकानदार व पित्याचा नाइलाज झाला. चार
दिवसांत यापेक्षाही मोठे घड्याळ आणून देण्याचे दुकानदाराने कबूल केल्यावर
पिता-पुत्र निघाले. चार दिवसांनंतर पिता-पुत्र घड्याळ विक्रेत्याकडे गेले. त्याने
नवीन मोठे घड्याळ दाखवले. मुलाने ते घड्याळ पाहून नाराजी व्यक्त केली.
मुलाला त्यापेक्षाही मोठे घड्याळ हवे होते. त्यावर दुकानदाराने डोक्याला हात
लावला. पुढारी पित्याचे मात्र चांगलेच टाळके सटकले. तो म्हणाला, “भाऊ, तुम्ही
आता अलार्मलाच बेल्ट लावून याच्या हाताला बांधा. बस्स..!” पिताश्रींच्या या
वाक्यामुळे मुलगा तावातावाने निघून गेला. दुकानदारासह उपस्थित ग्राहक
अलार्मच्या पर्यायावर हसून हसून लोटपोट झाले. रुसलेल्या मुलाने घड्याळ न
घेताच लग्न केले, हे विशेष..!
डिगंबर महाले, अमळनेर
एक सुखद अनुभव
जळगावातील एक पंचकोनी कुटुंबीय शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात
कोरोना चाचणी करण्यासाठी पोहोचले. सोबत एक वर्षाचे बाळ होते. गर्दी
नव्हतीच. अँटिजन चाचणी असल्याने दोन-चार मिनिटांत रिपोर्ट आला. या पाच
जणांपैकी दोन जण बाधित आढळून आले. एकाच कुटुंबातील दिसत असल्याने
आत बसलेल्या एक महिला परिचारिका बाहेर आल्या आणि त्यांनी या कुटुंबाची
चौकशी केली. कुठे बाहेरगावी गेले होते काय, आदी प्रश्न विचारत त्यांनी घाबरू
नका... औषधी घ्या... नियम पाळा... असे सांगत दिलासाही दिला. आणि तुमच्या
कुटुंबात लहान बाळ आहे, त्यामुळे निगेटिव्ह आलेल्या तीन जणांची
आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. यावर आधीच कावरे-बावरे
झालेल्या या लोकांनी मग आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. दुसऱ्या दिवशी
बाळासह तीनही जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या परिचारिकेने दिलेला सल्ला
कामात आला... विशेष म्हणजे बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळल्यावर
कुटुंबीयांना दु:खातही हायसे वाटले... असा एक सुखद अनुभवही या कुटुंबाला या चाचणी केंद्रावर आला.
- चुडामण बोरसे