जळगाव : दूध फेडरेशनजीकच्या भारतनगरातील रहिवासी शेख युसूफ शेख मोहम्मद (वय ५०) यांना रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री पावणे दहा वाजता प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनच्या पुढे घडली.
शेख युसूफ हे रेल्वेत बटाटेवडे विक्री करायचे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार प्रदीप शेजवळकर व अनिल नायडू यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. मुलींचे लग्न झालेली असून, मोठा मुलगा रिक्षा चालक आहे. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.