जळगाव : गेल्या पंचवीस दिवसांपासून अकरावीची प्रक्रिया सुरू असून चारही प्रतीक्षा याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता शिल्लक जागांवर १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश दिले जाणार आहे. बहुतांश महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील जागा फुल्ल झाल्या उर्वरित शिल्लक जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाविद्यालयांकडून देण्यात आली.
दहावी निकालानंतर २० ऑगस्टपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया प्रारंभ झाली. २० ते २४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २७ रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. नंतर यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. नंतर १ सप्टेंंबरला दुस-या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे २ सप्टेंबरला तिसरी तर ४ सप्टेंबरला चौथी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करून त्यांना प्रवेश देण्यात आला. आता ७ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची यादी व सवंर्गनिहाय यादी महाविद्यालयांकडून पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांमधील शिल्लक जागांवर १४ सप्टेबरपर्यंत प्रवेश देता येणार आहे.
वाणिज्य, कला शाखेच्या जागा शिल्लक
यंदा सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेसाठी प्राप्त झाले होते. परिणामी, या शाखेच्या संपूर्ण जागा फुल्ल झाल्या आहेत़ हातावर मोजण्या इतक्याच महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या जागा शिल्लक आहेत. तर दुसरीकडे कला व वाणिज्य शाखेच्या जागा अजूनही शिल्लक आहेत, त्या जागांवर प्रवेश देणे सुरू आहे. ही प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहिल. धनाजी नाना महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या २२ तर मू.जे. महाविद्यालयात १२ जागा शिल्लक आहेत.