लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवार, २० ऑगस्टपासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होत आहे. ऑन-ऑफलाइन या दोन्ही पध्दतीने महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून विद्यार्थ्यांना २० ते २४ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे अर्ज भरता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर मूल्यमापन पध्दतीनुसार निकाल जाहीर करण्यात आला होता़ मात्र, अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, त्यावर तोडगा काढीत सीईटीनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. २१ ऑगस्ट ही परीक्षेची तारीखसुध्दा जाहीर केली. परंतु, यात उच्च न्यायालयाने एंट्री घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सीईटी परीक्षा रद्द केली. नुकतेच काही दिवसांपूर्वी नाशिक विभागीय मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
अकरावीसाठी ४९,०८०जागा
जळगाव जिल्ह्यात २१८ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची ४९,०८० प्रवेश क्षमता आहे. यंदा दहावीत ५८ हजारांच्यावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे. दुसरीकडे महाविद्यालयांकडूनही प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण तयारी केली आहे. ऑन-ऑफलाइन या दोन्ही पध्दतीने महाविद्यालयांकडून प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांच्या संकेतस्थळांवर भेट देऊन प्रवेशाची माहिती जाणून घेऊन तात्पुरती नोंदणी केली आहे.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना शासन धोरणानुसार प्रवेश द्या
अकरावी प्रवेशासाठीची दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी २७ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर करावी, असे सांगितले. तसेच प्रवेश देताना मागेल त्याला शिक्षण यानुसार किमान विज्ञान विषयात ३५ टक्के गुण असणारा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत पात्र असेल असेही सांगितले. एटीकेटीसाठी प्रवेश देताना शासन निर्णयांचे अनुपालन करण्यात यावे, तर अनुदानित-विनाअनुदानित तुकड्यांना प्रवेश देताना विद्यालयाच्या शिक्षक-पालक संघामध्ये ठरवून दिलेली फी आकारण्यात यावी, अशीही सूचना करण्यात आली. यावेळी बैठकीत सहाय्यक शिक्षण उपसंचालक पुष्पलता पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, दिनेश देवरे, दीपाली पाटील, सुनील सोनार, नंदन वैनकर, शैलेश राणे, सुनील गरुड आदींची उपस्थिती होती. तसेच या कार्यशाळेत जवळपास २१० वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला होता.