जळगाव : आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध संवर्गात ६ हजार ६९५ उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव पोलीस दलाने तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात ६८४ जणांवर कारवाई झाली असून उर्वरित ६ हजार ११ जणांवर येत्या पाच दिवसांत कारवाई होणार आहे. काही जणांना गणेशोत्सवात दहा दिवसांसाठी जिल्ह्यातून बाहेर काढले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे यंदाही उत्सव साजरा करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी उपविभागीय व प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या हद्दीतील गणेश मंडळे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा प्रस्ताव मागविला आहे. दोन महिन्यांपूर्वी जळगाव शहर व भुसावळातील गुन्हेगारी टोळी हद्दपार केल्यानंतर आता गणेशोत्सवात गुन्हेगारी व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील एका जणांवर एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे. चोपडा, कासोदा व चाळीसगावात मात्र निर्धारित केलेल्या संख्येपक्षा जास्त उपद्रवींवर कारवाई झाली आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिले आहेत. पोलीस ठाणेनिहाय मंडळ व शांतता समितीच्या बैठकीत त्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. यंदा कोरोनामुळे बाप्पाचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढता येणार आहे. गणेशमूर्ती ४ ते ५ फुटांच्यावर नको, गणेश मूर्तीची आरती करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असून पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात गणेशमूर्तीची स्थापना करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय मनपा, नगरपालिका पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असणार आहे. गणेशमूर्तीची कोणत्याही प्रकारे विटंबना होणार नाही त्याकरिता आपल्या मंडळातील दोन सदस्यांना सकाळी व रात्री थांबणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनापरवानगी गणपतीची स्थापना केल्यास त्या मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिला आहे.
कोट...
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. विनापरवानगी गणेशाची स्थापना केली, तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक व एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार झाला असून, येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करून पोलिसांना सहकार्य करावे.
-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
असे होते मागील वर्षी जिल्ह्यातील गणेश मंडळ
सार्वजनिक : १७०१
खासगी : ४७९
एक गाव एक गणपती : १४१
अशा आहेत प्रतिबंधात्मक कारवाया
प्रकार कारवाईची संख्या
१०७ : ७०७
११० : १४९
१५१ (३) : ०४
१४४ : १०२
१४९ : २३००
१९३ : १५१
एमपीडीए : ०१
मुंबई पोलीस ५५ : ०४
मुंबई पोलीस ५६,५७ : १७