लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : येथील पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था भंग करणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या १२८ उपद्रवींवर नशिराबाद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. कायदा मोडणाऱ्या व शिस्तभंग करणाऱ्या उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. उत्सवात कायदा मोडणाऱ्या व गोंधळ घालणाऱ्या उपद्रवींची हयगय केली जाणार नाही, असेही सपोनि मोरे यांनी सांगितले. सीआरपीसी १६० प्रमाणे सात जणांवर ,११० प्रमाणे एक जणावर,मुंबई दारूबंदी अधिनियम ९३ प्रमाणे ३ जणांवर,१४९ प्रमाणे १०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर १४४ (२)(३) प्रमाणे आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.