लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर आता महापालिका आयुक्त बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा केली असून, संजय कापडणीस, राजेश कानडे व भालचंद्र बेहरे या अधिकाऱ्यांना महापालिकेत आणण्यासाठीही शिवसेनेचे काही नगरसेवक आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता उलथवून लावत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. त्यात राज्यात देखील शिवसेनेची सत्ता असल्याने त्या सत्तेचा उपयोग महापालिकेसाठी व्हावा यासाठी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना महापालिकेत आणण्यासाठी देखील आता रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात नगर विकास मंत्री शिवसेनेचेच असल्याने त्यांच्या माध्यमातून महापालिकेत नवीन आयुक्त मिळण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी देखील याबाबत नगर विकास मंत्र्यांशी चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मनपाचे विद्यमान आयुक्त सतीश कुलकर्णी हे देखील काही महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आधीच नवीन आयुक्तांसाठी शिवसेनेने पाठपुरावा सुरू केला आहे. संजय कापडणीस यांनीही जळगाव महापालिकेचे आयुक्त म्हणून २०१४ ते १६ दरम्यान काम पाहिले आहे. तर राजेश कानडे यांनीदेखील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून २०१७ मध्ये काम पाहिले होते. त्यावेळेस महापालिकेत खान्देश विकास आघाडीची सत्ता होती. यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांना पुन्हा जळगाव महापालिकेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
सत्ता बदलाच्या वेळेसच आयुक्त बदलाचाही दिला होता शब्द
महापालिकेतील भाजपमधील काही नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत गेल्यानंतर, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. ही सत्ता आणताना काही मुद्द्यांवर देखील चर्चा झाली होती. यामध्ये मनपा आयुक्त बदला सोबत राज्य शासनाकडून महापालिकेला काही निधी मिळावा यासाठीही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांशी काही नगरसेवकांनी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोट..
महापालिकेच्या आयुक्त पदासाठी काही नावांची चर्चा सुरू आहे. याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील हमी दिली असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचे लक्ष शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना रोखण्यासाठीच केंद्रित केले आहे.
-सुनील महाजन, विरोधी पक्ष नेता, मनपा