हा रस्ता टाकळी प्रचा गावासह खरजई, तरवाडे या गावांना उपयुक्त ठरणारा आहे. लॉकडाऊन व इतर काही कारणांमुळे रस्त्याचे काम वारंवार बंद करण्यात आले आहे. मागील ३ महिन्यांपासून हे काम बंदच आहे. सुरू असलेले काम अचानक बंद झाल्याने खरजई रेल्वे गेटच्या पुढे रोडवर टाकलेला खडीचा १ थर आता पावसामुळे वाहतुकीला अडथळा ठरत असून त्यामुळे अनेक अपघातदेखील झाले. त्याचप्रमाणे खरजई नाका ते खरजई रेल्वे गेट पर्यंतचे काँक्रिटीकरणाचे काम देखील तसेच पडून आहे.
खरजई नाका ते थेट तरवाडे पर्यंत या रस्त्याची स्थिती वाईट झाली आहे. पुढील आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा सूचक इशारा भाजयुमोचे शहराध्यक्ष व टाकळी प्रचा ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे, प्रल्हाद महाजन, विजय पाटील, शरद महाजन यांच्यासह धनंजय गांगुर्डे, सुधीर मांडोळे, भूषण महाजन यांनी दिला आहे.