जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी विजय निंबा ठाकरे (२१) याला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी शुक्रवारी ठोठावली.
लग्नाचे आमिष दाखवून विजय निंबा ठाकरे या तरूणा ने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. याप्रकरणी १० जून २०१९ रोजी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १२ जूनला दोघांना नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांकडे घेऊन आले. त्यानंतर पीडिता ही अल्पवयीन असताना सुध्दा तिच्यावर विजय याने अत्याचार केल्याची बाब समोर आली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात व न्यायालयात नोंदविण्यात आली व नंतर पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात अत्याचाराचे वाढीव कलम लावत दोषारोपपत्र जळगावातील विशेष न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले.
१५ साक्षीदार तपासले
सरकारपक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार साक्ष नोंदविण्यात आली. त्यात पीडिता, पीडितेचे वडील, तिच्या शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार, न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेचे तज्ज्ञ आदींच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. दोन्ही पक्षाचा युक्तीवादानंतर न्या.डी.एन.खडसे यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विजय ठाकरे याला अल्पवयीन पीडितेस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून शुक्रवारी शिक्षा सुनावली.
अशी आहे शिक्षा
पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत व पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी बालक लैगिंक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा- २०१२ कलम ३ (अ) मध्ये दोषी धरून कलम ३६३ नुसार सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद तसेच पोक्सो कलम (अ) मध्ये दहा वर्ष सश्रम कारावास व दोन हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड़ नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.