लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : अबब! १९२ कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या राज्यमार्ग १५ व राज्यमार्ग ६ सह इतर रस्त्यांच्या संगमावर असलेल्या बोरी नदीच्या पुलाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा एकदा अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
अमळनेर शहरातील बोरी नदीवरून जाणाऱ्या पुलावर रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, वाहन चालकांना त्रास होत आहे. वाहने खराब होत आहेत. विशेष म्हणजे या पुलाला जळोद- अमळनेर- चोपडा- धुळे राज्यमार्ग १५, पाळधी- शिंदखेडा राज्यमार्ग ६, पारोळा- अमळनेर- धरणगाव ढेकूमार्गे अमळनेर हे सर्व प्रमुख रस्ते बोरी नदीच्या पुलावर एकत्र येऊन मिळतात. अनेक रस्ते एकत्र येऊन पुलावर समाविष्ट होतात. त्यामुळे विविध रस्त्यांवर झालेला खर्च पाहता रस्ता अधिक मजबूत झाला पाहिजे होता; पण प्रत्यक्ष तसे न होता उलट पुलावरील काम ज्या- ज्या रस्त्याच्या ठेकेदाराने केले त्याने आपला पैसा वाचेल, असे समजून ते काम कोणीच केलेले नाही. पुलावरील रस्त्याची स्थिती म्हणजे ‘बारासनी माय खाटला वर जीव जाय’ अशी झाली आहे. पाळधी- अमळनेर- बेटावद या राज्यमार्ग सहासाठी १०३ कोटींची तरतूद होती, तर धुळे- चोपडा या राज्यमार्ग १५ साठी ८९ कोटींची तरतूद होती. नुकतेच काही महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाले आहे. अंदाजपत्रकात रस्त्याची संपूर्ण लांबी मोजली आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या राजकारणात एका रस्त्याचे काम धुळे सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत वर्ग करण्यात आल्याने अमळनेर विभागाने सोईस्कर कानावर हात ठेवले आहेत. वास्तविक काम अमळनेर क्षेत्रात होत असल्याने जबाबदारीदेखील त्यांची होती. मात्र, ते टाळाटाळ करीत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. १९२ कोटी खर्चून जर खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत असेल, तर यापेक्षा वाईट परिस्थिती काय असेल, अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
---
कोट
मी नव्यानेच पदभार घेतला आहे. दोन्ही रस्त्यांची माहिती घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची व्यवस्था केली जाईल.
-हेमंत महाजन,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर
०२सीडीजे१