लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा वर्दळीचा रस्ता वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस अरूंद होत चालला आहे. महापालिकेने संबंधितांना त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसांची मुदत नुकतीच दिली होती. प्रत्यक्षात बरेच दिवस उलटूनही काहीच कारवाई झाली नाही. अतिक्रमणधारकांना त्यामुळे पुन्हा अभय मिळाले आहे.
लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून शनी मंदिराकडे जाताना चौघुले प्लाॅटसमोर असलेला ममुराबाद जकात नाका वाढत्या अतिक्रमणांमुळे आता दिसेनासा झाला आहे. नाक्याची जुनी खोली जेमतेम तग धरून उभी असली तरी आजुबाजुला वाढलेली पक्क्या घरांची अतिक्रमणे पाहिल्यानंतर नाका अतिक्रमणात आहे की महापालिकेच्या जागेत अशी शंका उपस्थित होत आहे. नाका महापालिकेच्या जागेत असेल त्याच्या परिसरात असलेली सर्व घरे नियमित कशी काय झाली आणि अतिक्रमित घरांकडे इतके दिवस महापालिकेने लक्षच दिले नसेल का, असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत. अशीच स्थिती पुढे मायक्का देवी मंदिर परिसरात झाली आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी खूपच कमी झाल्यामुळे याठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांमध्ये वाद होण्याच्या घटनादेखील घडू लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने अतिक्रमणांकडे वेळीच लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.